झॉम्बी कॅटरपिलर

जैवविविधता/ जिविधा दिनाच्या निमित्ताने दृष्टीआडच्या सृष्टीतली ही एक गंमत.
निसर्ग आणि अद्भुतता हे समीकरण भन्नाट आहे. या फोटोत तुम्हाला एका फांदीवर केसाळ सुरवंट दिसेल. फांदीखाली फेसाळ लोलक आणि त्याच्या शेपटीजवळ काही पांढरट धागे. हे काय असेल बरं? हा आहे झॉम्बी कॅटरपिलर. ‘मान न मान मै तेरा मेहमान’ या उक्तीचं खणखणीत उदाहरण म्हणजे हा सुरवंट. झॉम्बी म्हणजे झपाटलेला. झपाटून जावं असंच अद्भूत पण दुर्दैवी असं काहीतरी या सुरवंटासोबत घडलं आहे. मागे एकदा मी पॅरासिटॉईड वास्पबद्दल सांगितलं होतं (अधिक माहितीसाठी हि लिंक पाहा http://bit.ly/2X1qWSk). ही वास्प तिची अंडी दुसर्‍या जीवांच्या शरीरात घालते आणि जन्माला येणार्‍या अळ्यांना आयतं अन्न उपलब्ध करून देते. हा सुरवंटही त्यातल्याच एका प्रकारच्या माशीचा शिकार झालेला आहे. त्या माशीने या सुरवंटाच्या शरीरात तिचा ओव्हीपॉझिटर (अंडी बाहेर येणारी लांबलचक नळी) खुपसून त्यातून अंडी सोडली. आत शिरलेली अंडी फलीत झाल्यावर त्यातून तिचे लारव्हे बाहेर आले. हे लारव्हे आता सुरवंट जे खाईल त्या पौष्टीक खाद्यावर स्वतः ताव मारायला लागले. त्याला कुठलीही इजा न करता. असं करताना त्यांचा आकारही वाढत गेला आणि कोषात जायची वेळ आली. आता आतमध्ये तर इतकी जागा नाही. त्यातून या लारव्हांकडे स्वतःचा कोष विणायची सोय नाही आणि स्वसंरक्षण करायचीही नाही. मग आता काय बरं करावं? इथे सुरू होतो निसर्गाचा अद्भूत खेळ! हे लारव्हे सुरवंटाच्या शरीराला अलगदपणे छिद्र पाडून बाहेर येतात आणि बाहेर येतायेता काही विशिष्ट द्रव्य स्रवून सुरवंटाला असं काही झपाटून टाकतात की तो स्वतःच्या सिल्कचा वापर या लारव्हांच्या भोवती कोष विणण्यासाठी करतो आणि त्या कोषाचं संरक्षण करत उपाशी तापाशी तिथेच बसून राहतो. मी जेव्हा याला काठीने डिवचलं तेव्हा त्याने झटक्यात डोकं उचलून काठीला त्याच्या केसाळ केसांनी दंश केला. काही दिवसांनी या कोषातून पूर्ण वाढ झालेल्या माश्या बाहेर येऊन उडून जातात आणि सुरवंट मात्र अनंताच्या यात्रेला निघून जातो. इथेच शेजारच्या झाडावर असाच एक उघडा पडलेला कोष आणि मृत सुरवंट आम्ही पाहिला.
‘हे क्काये?’ ह्या माझ्या भोचकपणाच्या झाडाला लागलेलं हे अजून एक मधुर फळ. तुमच्यामध्येही ‘हे क्काये?’ या वृक्षाचं बीज रूजो आणि त्या वृक्षाची अखेरच्या श्वासापर्यंत भरभराट होवो.. आजच्या जैवविविधता दिनाच्या शुभेच्छांसह तुमचाच..

मकरंद केतकर.
(फोटो: मकरंद केतकर | आंबोली | नोव्हेंबर २०१८).
Insearch Outdoors

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *