गोष्ट ऐतिहासिक युतीची.

युती शब्दासोबत डोळ्यासमोर उभं राहतं राजकारण. हेवेदावे, मानापमान, धमक्या, कुरघोड्या आणि बरंच काही. पण आज मी जे सांगणारे ती गोष्ट आहे एका ऐतिहासिक युतीची. खरंतर याला ऐतिहासिक म्हणणंही चुकीचं आहे कारण या युतीचं वय आहे कदाचीत काही दशकोटी वर्षं किंवा त्याहून जुनं. कुठल्याही प्रकारे न भांडता फक्त ‘विकास’ घडवणारी ही युती आहे ‘मायटोकाँड्रीया आणि पेशी’ यांची. थोडंसं किचकट वाटू शकेल पण सावकाश वाचलं तर सहज समजेल. तर, ही युती झाली आणि आज आपण जे जीवन बघतोय ते बहुढंगी अस्तित्वात आलं. जीवसृष्टीची विभागणी दोन भागात होते. एकपेशीय जीव आणि बहुपेशीय जीव. शास्त्रीय भाषेत प्रोकॅरिओटस् आणि युकॅरिओटस्. प्रोकॅरिओट्समध्ये विविध बॅक्टेरिया तसेच व्हायरसेसचा समावेश होतो तर युकॅरिओट्समध्ये इतर सर्व जीवांचा समावेश होतो. या दोन्हीतला मुख्य फरक म्हणजे आपल्या पेशींमध्ये न्युक्लियस आणि त्यामध्ये क्रोमोझोम्स म्हणजेच डी.एन.एची बंडल्स असतात तर बॅक्टेरियामध्ये पेशीचा केंद्र असलेलं न्युक्लिअस नसतं. त्यामुळे क्रोमोझोम्स नुसतेच तरंगत असतात. बाकीही अनेक फरक आहेत त्याबद्द्ल नंतर कधीतरी बोलू.
आता वळूया युतीकडे. आपल्या पेशींमध्ये असलेली (आणि बॅक्टेरियामध्ये नसलेली) अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे मायटोकाँड्रीया ज्यापासून पेशींना आणि सर्वार्थाने शरीराला उर्जा देणारे ए.टी.पी म्हणजे अ‍ॅडिनोसीन ट्रायफॉस्फेट हे विचंतक (एन्झाईम). आपण जे अन्न खातो त्यातल्या कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्सपासून हे मायटोकाँड्रीया ग्लुकोज तयार करून त्याच्यापासून पुढे एक प्रकारची विद्युत उर्जा निर्माण करतात. म्हणूनच मायटोकाँड्रीयाला पेशीचे पॉवरहाऊसही म्हणतात. पण खरी गंमत ही आहे की हे मायटोकाँड्रीया एक स्वतंत्र बॅक्टेरियासदृष जीव आहेत ज्यांच्याकडे स्वत:चा वेगळा डी.एन.ए सुद्धा आहे. मग हे आपल्या पेशींमध्ये काय करतायंत? तर याचं उत्तर आहे परस्परावलंबन म्हणजेच युती. ही युती नेमकी केव्हा घडली याबद्दल अजूनही संशोधन चालू आहे. पण पेशींमुळे त्यांना अन्न मिळते आणि त्यांच्यामुळे पेशींना उर्जा मिळते.
हे झालं प्राण्यांबद्दल. मग वनस्पतींचं काय? तर वनस्पतींमध्ये असलेलं क्लोरोप्लास्ट हे सुद्धा मायटोकाँड्रीयासारखेच कधीकाळीचे स्वतंत्र वावरणारे परंतू स्वतःचं अन्न तयार करू शकणारे सायनोबॅक्टेरिया होते जे नंतर वनस्पतींच्या पेशींमध्ये शिरून राहू लागले व प्रकाशसंस्लेषणातून (फोटोसिंथेसीस) हवेतल्या कार्बनच्या सहाय्याने मुळांनी शोषलेल्या पोषक तत्वांचे रुपांतर ग्लुकोज मध्ये आणि नंतर ग्लुकोजचं रुपांतर उर्जेत करू लागले. हे करताना जास्तीचे ग्लुकोज पानांमध्ये तसेच खोडामध्ये साठवले जाते ज्याचा उपयोग इतर जीव पोट भरण्यासाठी करून उर्जा मिळवतात.
मायटोकाँड्रीया आणि क्लोरोप्लास्टमधला मुख्य फरक हा की मायटोकाँड्रीयाला बाहेरून ग्लुकोज मिळवावं लागतं तर क्लोरोप्लास्ट स्वतःचं ग्लुकोज तयार करतं.
अशाप्रकारे ही दोन जीवांची युती जोवर अभेद्य आहे तोवर सजीवांच्या शासनाला कुठल्याही अस्थिरतेचा धोका नाही हे निश्चित.
मग एक प्रश्न असा पडतो की समजा आपल्या पेशींमध्ये आपण मायटोकाँड्रीयाऐवजी क्लोरोप्लास्ट ठेवले तर स्वतःची उर्जा स्वतः तयार करू शकू का? खरंतर असं एण्डोसिंबायोसिस’ शक्य होईल का ठाऊक नाही पण झालंच तर आपणही वनस्पतींसारखेच संथ गतीचे होऊ. कारण प्रकाशसंस्लेषण ही सावकाश होणारी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी खूप वेळ उन्हात थांबावे लागेल. त्यापेक्षा बाजारातून भाजी विकत आणून खाणे जास्त सोपे आहे, नाही का?

मकरंद केतकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *