सीतेची आसवे

हे फुल आहे युट्रीक्युलारीया म्हणजेच ‘सीतेची आसवे’. त्या फुलाच्या रंगरूपाला गोडवा आणणारं त्याचं नावही तितकच अस्सल मराठमोळं. सह्याद्रीच्या खडकाळ पठारांवर उगवणारी, बोटभर उंचीची आणि नखभर फुल मिरवणारी ही वनस्पती मांसाहारी आहे हे त्या फुलाकडे पाहून पटणं, निदान पहिल्या भेटीत तरी अशक्यच.
कीटकभक्षी वनस्पती म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर चिकट द्रावाचे द्रोण भरलेल्या वनस्पती येतात. पण ही वनस्पती जराशी वेगळी आहे. म्हणजे या वनस्पतीच्या मुळांवर सुक्ष्म छिद्र आणि दाट केस असलेल्या पिशव्या असतात.
या पिशव्या म्हणजे जणू जठरच. या पिशव्यांमधून अतिसुक्ष्म कीटक अडकतात आणि पचवलेसुद्धा जातात. उघड्या खडकावर, कातळावर, जांभ्या दगडाच्या सच्छिद्र दगडांवर ही वनस्पती उगवते. मुळात सड्यावर माती कमी आणि त्यामुळे आवश्यक क्षार, नत्र वगैरेही कमी. ही कमी भरून काढण्यासाठी कीटक भक्षण केले जाते.
उन्हाळ्यात भकास वाटणार्‍या खडकांच्या कुशीत अशा अनेकविध चिंटूपिंटू वनस्पतींची सुक्ष्म बीजं लपलेली असतात. या बीजांना अंकुरण्यासाठी त्यांचं घर सुरक्षित राखणं हे आता आपलंच काम. नाही का?
(मुळांचा फोटो विकीपेडीयावरून साभार.)

मकरंद केतकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *