सात आसरा

निसर्गवाचन करताना त्यातल्या विविध घटकांशी जोडल्या गेलेल्या मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा दिसणं अत्यंत स्वाभाविक आहे. कारण मुळातच भारतीय संस्कृतीची मुळं जंगलांमधे फार खोलवर रूजलेली आहेत. मग तो रामाचा वनवास असो की पांडवांचा अज्ञातवास. या संस्कृतीने जन्माला घातलेल्या अनेक देवता ह्या वृक्ष तसेच प्राण्यांच्या रुपात प्रकटलेल्या आहेत. परंपरेने चालत आलेल्या त्यांच्या भजनपुजनामधे अनेक कथा उपकथांचा समावेश झाला. त्यामुळे त्यातून या देवतांना कधी सात्विक तर कधी तामसी भाव मिळाले. देवराई या संकल्पनेत, जंगलांचं रक्षण करणारी वनदेवता स्थापिली गेली. या देवतेला मखर म्हणून तिच्या आसपास असलेलं जंगल तिच्या नावाने राखलं गेलं. तसेच या वनाला बाधा पोहोचवणार्‍याला शिक्षा म्हणून वंशनाश वगैरे शापांची आयुधंही तिला बहाल करण्यात आली. अर्थात यामागे, वनांचं महत्व ओळखणार्‍या आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी कारणीभूत होती.
याच देवतांचं अजून एक रूप म्हणजे जलदेवता. यांना साती आसरा, सप्त अप्सरा, सात आसरा अशा विविध नावांनी ओळखलं जातं. या पाण्याच्या रक्षणकर्त्या देवता आहेत. या सात आसरांची निर्मिती पार सिंधू संस्कृतीपर्यंत मागे जाते. अनेक लेण्यांमधे तसेच किल्ल्यांवर पाण्याच्या टाक्याजवळ यांची शिल्पे आढळतात. पण प्रत्येक वेळी शिल्पच हवीत असे असावे असं वाटत नाही. नुसता शेंदूर फासलेला दगडही भक्तांना मानसिक आधार पुरवतो. या फोटोतल्या सात आसराही अशाच सात शेंदरी वर्तुळांमधून प्रतिस्थापीत झाल्या आहेत. मानवी संस्कृती हा माझा अभ्यासाचा विषय नाही. पण निसर्ग अभ्यासक म्हणून त्यांच्या रुपाने संरक्षण झालेल्या पाण्याच्या स्त्रोतांमुळे, मला त्या निश्चितच महत्वाच्या वाटतात. या सात आसरांबद्दल, ‘त्यांच्या पाणवठ्यात प्रवेश करणार्‍या लहान मुलांना, गर्भवती स्त्रियांना त्या आतमधे खेचून त्यांचा जीव घेतात’ अशी अंधश्रद्धा रूढ आहे. पण या पाण्याचा उपयोग गावकरी दैनंदिन वापरासाठी करतात. मला वाटतं की पाणवठ्याचं पावित्र्य राखण्यासाठी ही भिती घालून दिली असावी. अर्थात तज्ञांनी यावर अधिक माहिती दिली तर निश्चितच आवडेल.
आपल्या संस्कृतीची भलामण करताना नीरक्षीर विवेकबुद्धीने त्यातल्या अंधश्रद्धा गाळाव्यात हे अनेक अंधश्रद्धा निर्मूलक आग्रहाने सांगतात. त्यात गैर काहीच नाही. पण यातल्याच काही अंधश्रद्धांनी आपला नैसर्गिक वारसा टिकवण्याचं महत्वाचं काम केलं आहे. शेवटी काय टाकाऊ आणि काय टिकाऊ हे भविष्यातील परिणांमावरच अवलंबून असतं. त्यामुळे किमान या वारशाच्या जपणूकीसाठी तरी या अंधश्रद्धा डोळसपणे जोपासायला काय हरकत आहे?

मकरंद केतकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *