वृक्षचर मुंग्या – बाप कारागीर

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हे आपल्या कृतीमधून दाखवून देणार्‍या ह्या विव्हर अँटस म्हणजे शिलाई मुंग्या. खरतर त्यांना चिकटू मुंग्या म्हणणं जास्त योग्य ठरेल. त्याचं कारण पुढे सांगतोच आहे. भारतात मुंग्यांच्या शेकडो जाती आहेत. त्यातल्या प्रत्येक कुळाचे रंग, रूप, ताकद, आकार, स्वभाव, हुशारी, कुळाचार आणि कुळधर्मही निरनिराळे.
मागे एकदा मी झाडावर चिखल-माती-पानांचे कुंभ बनवणार्‍या अ‍ॅक्रोबॅट मुंग्या म्हणजे क्रेमॅटोगॅस्टर मुंग्यांबद्दल सांगितलं होतं. https://goo.gl/Rnb03I
आज ज्या मुंग्याबंद्दल सांगतोय त्या मुंग्याही वृक्षचर कुळातल्याच. यांना शास्त्रीय भाषेत ‘ओईकोफायला’ म्हणतात. पण यांची कुंभ बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. क्रेमॅटोगॅस्टर मुंग्या लाकडाचा चोथा, पानं आणि लाळ एकत्र करून गोलसर कुंभ बनवतात. ओईकोफायला मात्र जिवंत पानं एकत्र चिकटवून हे कुंभ बनवतात. मुंग्यामधे सहसा तीन प्रकारच्या मुंग्या आढळतात. राणी मुंगी, नर मुंग्या आणि कामकरी मुंग्या. ज्या मुंग्या ‘पार्थिनोजेनीक’ म्हणजे ‘स्व-समागम-स्वयंपूर्ण’ (हा मीच ठोकून काढलेला शब्द आहे) असतात त्यांना पुनरूत्पादनासाठी नरांच्या सहाय्याची गरज नसते. राणी मुंगी डायरेक्ट अंडी घालते आणि जन्माला आलेल्या मुंग्याही सगळ्या माद्याच असतात. आपल्या चिकटू मुंग्यांमधे नर आणि माद्या दोन्ही असतात आणि एका व्यवस्थित एस्टॅब्लिश्ड कॉलनीमधे हजारो मुंग्या न भांडता राहात असतात. या चिकटू मुंग्यांना जेव्हा नवीन घर बनवण्याची गरज भासते तेव्हा त्यांच्यामधल्या कामकरी मुंग्या भरपूर पानं असलेलं नवीन झाड शोधून कामाला सुरूवात करतात. सर्वात आधी एक टीम निवडलेल्या जागेमधली शेजारी शेजारी असलेली पानं, एकमेकांचे पाय तोंडात पकडून आणि साखळी बनवून जवळ खेचून धरते. त्यांच्या जबड्याची पकड चिमट्यासारखी घट्ट असते. त्यामुळे पानं हलत नाहीत. आता, दुसरी टीम आधीच्या घरट्यामधून अंड्यातून जन्माला आलेल्या अळ्या घेऊन येते. या अळ्यांच्या शरीरातून चिकट रेशीम स्रवतं. अळ्या घेऊन आलेली टीम दोन पानांच्या मधे फेविस्टीक फिरवावी तशा अळ्या घासून फिरवते आणि या अळ्यांच रेशीम दोन्ही पानांना एकत्र जोडेल याची तजवीज करते. पानं चिकटली की मग आधीची टीम पुढची पानं एकत्र खेचून धरते आणि मग पुन्हा अळ्या फिरवल्या जातात. असं करत करत बरोब्बर गोलसर आकाराचा कुंभ बनवला जातो. हा कुंभ बाहेरून बनत असताना काही मुंग्या याच अळ्यांच रेशीम वापरून आतमधले कप्पे तयार करतात ज्यामधे राणीमुंगी, अंडी, नवीन अळ्या, इतर मुंग्यांची आसर्‍याची सोय इ. सगळ्यासाठी खोल्या बनवल्या जातात. यांच्यामधीलच काही जाती तर चक्क मधासारखं द्रव्य निर्माण करणारे किडे आपल्या घरट्यात पाळतात आणि त्यांना संरक्षणही देतात. स्वभावाने या मुंग्या प्रचंड आक्रमक असतात आणि घरट्याला इजा पोहोचवणार्‍याला कडकडून चावतात. त्यांच्या या घरट्याच्या झाडालाही पुष्कळ फायदा होतो. कारण ज्या झाडावर या मुंग्या घरटं करतात त्या झाडावरील सर्व इतर किटकांची त्या शिकार करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मुंग्या त्यांच्या वजनाच्या शंभरपट जास्त वजन उचलू शकतात. त्यामुळे त्या मोठे कीटकही उचलून नेऊ शकतात. त्यामुळे झाडाचंही आयुर्मान वाढतं. त्यांच्या याच स्वभावाचा माणसाने अत्यंत हुशारीने वापर करून घेतलेला आहे. इसवी सनाच्या तीनशेव्या शतकापासूनचे चीनमधले संदर्भ तसेच सध्याही इंडोनेशिया, थायलंड वगैरे देशातल्या शेतीच्या पद्धती पाहून लक्षात येतं की संत्री, आंबा, काजू, कॉफी अशा विविध पिकांमधे मुद्दाम या मुंग्यांचे कुंभ आणून ठेवले जातात आणि त्यांना एका झाडावरून दुसर्‍या झाडावर जायला बांबूंचे पूलही बनवले जातात. त्यामुळे शेतकर्‍याचा कीटकनाशकांचा खर्च खूप कमी होतो. एकदम ट्रुली ऑरगॅनिक फुड.
तर असं आहे हे मुंगीमहात्म्य. त्याचं पठण करताना सहज विचार येतो की, ‘मुंगी उडाली आकाशी’ असं माउलींनी जसं अध्यात्मात लिहिलंय तसंच कदाचीत ‘मुंगी शिरली बागांमधी’ या अर्थाचं एखादं चायनीज संतवचन असेल का हो? कुणास ठाऊक! असेलही कदाचीत.
(सदर फोटो ताम्हिणी घाटात परवाच रात्री काढलेला आहे. त्यात तुम्ही तोंडात पांढर्‍या अळ्या घेऊन जाणार्‍या एकदोन मुंग्या पाहू शकता).

मकरंद केतकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *