वानर वार्ता

ख्यॅक ख्यॅक, आँख्यु आँख्यु ख्यॅक. असे आवाज काढून जंगलामधे धोक्याचा खात्रीशीर इशारा देणारी ही वानरं, हनुमान लंगूर या नावाने ओळखली जातात.चितळ किंवा भेकर नुसती शंका आली तरी इशारे द्यायला सुरवात करतात. पण उंचावरून टेहळणी करणारी ही वांदरं, प्रत्यक्ष शिकारी प्राणी दिसल्याशिवाय इशारे देत नाहीत. त्यामुळे इतर प्राण्यांना सावध करणारे हे भरोसेमंद चौकीदार आहेत. यांचा कळप दिवसभर पानं, फुलं, फळं, छोटे मोठे किडे यावर गुजराण करत असतो. जंगलामधे बीजप्रसाराचं आणि वनस्पतींच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्याचं महत्वपूर्ण काम ही वानरं बजावत असतात. यांच्या सामाजिक राहणीमानात तीन पद्धतीचे कळप आढळतात.
* प्रमुख नर आणि माद्या – यामधे इतर नरांना कळपात स्थान नसतं आणि पितृत्वाची जबाबदारी एकाच नराची असते.
* अनेक नर आणि माद्या – यामधे अनेक नर आणि माद्या असतात. या पद्धतीत प्रमुख नरापासून बहुतांशी पिल्लं होतात आणि मग कळपातील हुद्द्याप्रमाणे उर्वरीत नर बाप बनतात.
* फक्त नर कळप – वरील दोन्ही कळपांमधे ‘पद’ न मिळालेले ‘सन्माननीय बॅचलर्स’ कळप करून एकत्र हिंडतात आणि वरीलपैकी कुठल्यातरी कळपामधे शिरकाव करून घेण्याची संधी शोधत असतात.
कळपाचा प्रमुख होण्यासाठी ही वानरं प्रसंगी अतिशय आक्रमकही होतात. भांडणं करून कळपाचा प्रमुख बनल्यानंतर नवीन नर आधीच्या नरापासून झालेली पिल्लं मारून टाकतात आणि स्वतःची संतती निर्माण करतात. हनुमान लंगुरांचा दिवसातला बहुतांश वेळ झाडावरून उतरून जमिनीवर अन्न शोधत हिंडण्यात जातो. मात्र अशावेळी कळपातील दोन तीन सदस्य झाडावरच राहून आजूबाजूला लक्ष ठेवत असतात. आणि संकटाची चाहूल लागताच सगळा कळप दहा पंधरा फुटांच्या टणाटण झेपा घेत झाडांच्या आश्रयाला जातो. दिवसभराची कामंधामं आटोपल्यावर सूर्यास्तानंतर हे सगळे झाडांवरच झोपी जातात. पण अशावेळीसुद्धा कळपाचा प्रमुख नर अधिकारवाणीने झाडाच्या सर्वोच्च आणि सुरक्षीत जागी झोपतो. त्याखालोखाल पिल्लं असलेल्या माद्या आणि मग उर्वरीत कळप आपापल्या जागा घेतो.
आयत्या अन्नाच्या शोधात वस्तीत शिरून धुमाकूळ घालणार्‍या वानरांचा त्रास होत नाही अशा फार कमी वस्त्या भारतात असतील. पण वानराला दैवीरूपात पाहिलं जात असल्याने त्यांची हत्या केली जात नाही. कवीकल्पनेतून प्रभु रामचंद्र आणि सीतेला वानराच्या हृदयात स्थान देणार्‍या आपल्या संस्कृतीने खुद्द या वानरांनाच आपल्या हृदयात स्थान दिलंय. यापेक्षा अधिक मोठी सहिष्णुता काय असेल?
– मकरंद केतकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *