वनस्पतींमधली संरक्षण व्यवस्था

तुम्हाला कांदा चिरताना डोळ्यात पाणी येतं का?, गुलाबाचे काटे बोचतात का?, खाजकुयलीने खाजतं का? या प्रश्नांचं उत्तर जर ‘हो’ असेल तर तुम्ही वनस्पतींच्या संरक्षण व्यवस्थेला सामोरे गेले आहात असं समजा.
पुनरूत्पादनानंतर, ‘स्वसंरक्षण’ हा प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाचा पाया आहे. चर आणि अचर असे दोन्ही सजीव म्हणजेच प्राणी आणि वनस्पती हे दोन्ही घटक आपापल्या पद्धतीने स्वतःचं, पिल्लांचं आणि कळपाचं संरक्षण करत असतात. ज्यांच्याकडे हत्यार वा रसायन उपलब्ध नाही वा फारच कमकुवत आहे, ते भरमसाठ प्रजननाद्वारे स्वतःच्या जातीचं अस्तित्व टिकवून ठेवतात. प्राणी नखं, शिंग, दात, खूर, आवाज, ताकद, विष, रसायनं, गतीमानता, कठीण कवच, मायावरण (कॅमोफ्लॉज) अशा विविध माध्यमांमधून स्वसंरक्षण करतात.
प्राणी आणी वनस्पती या दोघांहीमधे त्यांच्या स्वसंरक्षणाची दृष्यमानता कधी थेट समजते तर कधी अनुभवातूनच उमजते. तर आपण आता वनस्पतींमधल्या विविध ‘डिफेन्स मेकॅनिझम’ची ओळख करून घेऊ.
१) काटे:- मराठीत कुठल्याही आकाराच्या काट्याला आपण सरसकट ‘काटाच’ म्हणतो पण इंग्लिशमधे यासाठी अजून स्पेसिफीक टर्म्स आहेत. काटे हे वनस्पतीची ‘फर्स्ट लेव्हल डिफेन्स सिस्टिम’ आहे जी शाकाहारींपासून वनस्पतीचे रक्षण करते.
अ) Thorns:- आकाराने सणसणीत मोठ्या आणि अणकुचीदार असणार्या काट्यांना थॉर्न्स म्हटलं जातं. हे डोळ्यांना अगदी सहज दिसतात आणि त्यांच्यापासून बचावही करता येतो.
ब) Prickle:- गुलाबाच्या देठावर असलेल्या लहानशा काट्यांना प्रिकल्स म्हटलं जातं. कुठल्याही थॉर्न्स किंवा प्रिकल्समधे विष नसते.
क) Spine:- निवडुंगावर असलेल्या कडक व सडपातळ काट्यांना ‘स्पाईन’ असं म्हटलं जातं.
ड) Trichome:- खाजकुयलीच्या फळांवर असलेल्या बारीक लवसदृश केसांना ट्रायकोम म्हणतात. या केसांचा स्पर्श झाल्यावर प्रचंड खाज सुटते.

२) Idioblast:- आयडियोब्लास्ट हा पेशीचा एक विशिष्ट प्रकार आहे जो लँडमाईनसारखा काम करतो. या पेशींमधे विविध रसायने व संयुगे असतात जी त्या झाडाला तृणभक्षींपासून संरक्षण देतात. आयडियोब्लास्ट या पेशी झाडाच्या पानांमधे असतात आणि पान चावल्यानंतर त्या पेशींमधून खाजणारी रसायने सोडली जातात. बागेत लावल्या जाणार्या डायफेनबॅकीया (dieffenbachia) या शोभेच्या झाडाच्या पानामधे कॅल्शियम ऑक्सेलेटची संयुगं असतात जी पक्षाघात घडवून आणू शकतात.

३) परस्परावलंबनः- काही झाडे सुरक्षा म्हणून ‘सिक्युरिटी आऊटसोर्सिंग’ करतात. या प्रकारात झाडामधून एक विशिष्ट द्रव पाझरतो जो काही जातीच्या मुंग्यांना आकर्षित करतो. हा द्रव आपल्यालाच मिळावा म्हणून मुंग्या त्या झाडाचं प्राणपणाने रक्षण करतात. बाभळीच्या काही जातींमधे हा प्रकार पाहायला मिळतो. अशा प्रकारे मुंग्यांनाही खाऊ मिळतो आणि त्या झाडाला तोंड लावायची इतर प्राणी हिंमत करत नाहीत.

४) विषः हा प्रकार आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. फळ, खोड, मुळ, पान आणि बी अशा कुठल्याही एका किंवा अनेक प्रकारे झाड विषारी पदार्थाची निर्मिती करून स्वतःचं किंवा भावी पिढीचं संरक्षण करू शकतं. अशा विषारी वनस्पतींचा होस्ट प्लॅंट म्हणून वापर करणारी काही फुलपाखरेसुद्धा विषारीच असतात आणि पक्षी त्यांना तोंड लावत नाहीत. आपल्या सह्याद्रीत आढळणारी प्लेन टायगर, कॉमन रोझ, मलबार ट्री निम्फ यासारखी फुलपाखरं हळदीकुंकू (Asclepias curassavica), रूई (Calotropis gigantea), नागलकुडा (Parsonsia spiralis) या विषारी झाडांवर आपले सुरवंट पोसतात जे इव्हेंच्युअली विषारी फुलपाखरं बनतात.

५) लाजाळू:- लाजाळूचं झाड माहीत नसेल असा मनुष्यच विरळा. याच्या पानांना स्पर्श केल्यावर त्या वनस्पतीला धोक्याची जाणीव होऊन संरक्षण व्यवस्था जागृत होते आणि विद्युत संदेशांद्वारे पानांच्या पेशींमधे असलेला ताण अचानक नाहीसा केला जातो आणि पानं भराभर मिटली जातात. सर्वकाही आलबेल असल्याची जाणीव झाल्यावर ही पानं परत उघडली जातात. अशी वैचित्र्यपूर्ण उघडझाप करण्यामागचा उद्देश तृणभक्षींना घाबरवणे हा असावा.

६) रासायनिक संदेशः- अनेक वनस्पती केमिकल सिग्नलिंगद्वारे आसपासच्या झाडांना धोक्याची जाणीव करून देतात. काही वनस्पती स्वतःमधे क्षणार्धात रासायनिक बदल करून पानांची चव बदलून टाकतात. आपल्या अतिपरिचयाचं उदाहरणं म्हणजे कांदा. कांदा चिरायला घेतल्यावर त्यातून सल्फ्युरीक अॅंसीडचे कण हवेत पसरतात. हे कण डोळ्यातल्या अश्रू निर्माण करणार्या ग्रंथींच्या संपर्कात येताच डोळ्यांची आग आग होते व त्या कणांच्या निर्मूलनासाठी डोळ्यातून नीरधारा वाहू लागतात.
आता तुम्हाला लक्षात आलं असेल की किती विविध प्रकारे वनस्पती स्वतःचे संरक्षण करतात. या सर्व प्रकारांमागे कुठलाही खुनशी उद्देश नसतो तर अस्तित्व अबाधीत ठेवण्याची माफक अपेक्षा असते. आशा करतो की या लेखाच्या वाचनानंतर तुमचंही निसर्गाबद्दलचं कुतूहल वाढेल व तुमची प्रत्येक भटकंती आणि प्रत्येक निरीक्षण तुम्हाला ‘का?’ या प्रश्नाचं उत्तर शोधायला प्रवृत्त करेल.
– मकरंद केतकर.
Photo source:- https://www.flickr.com/photos/leoparguy/3659044606

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *