मायक्रो हॅबिटॅट्स – सुक्ष्म अधिवास

आपल्या आयुष्यात भव्यतेला जे स्थान आहे, जो मान आहे, तो सुक्ष्मतेला मिळेलच असं नाही. कदाचीत ‘लार्जर दॅन लाईफ’ची माणसाला असलेली आवड याला कारणीभूत असू शकेल. आपल्याला शेकडो चौरस मैलातली जंगलं, अगडबंब नद्या, कासवर फुलणारी फुलांची मोठ्ठी कारपेट्स, असं सगळं कसं मोठ्ठं मोठ्ठं, भव्य दिव्य आवडतं. पण त्याच जंगलात कुजलेल्या ओंडक्याखाली उगवलेली छोटीशी अळंबी, छोटे छोटे ओहोळ, कासवरतीच उगवणारी गवतासारखीच हिरव्या रंगाची आणि दृष्टीला न सुखावणारी फुलं हे मात्र आपल्या खिजगणतीतही नसतं. वास्तवीक, अशाच असंख्य अगणित सुक्ष्म पातळीवरील वैविध्यांचं मिलन होऊन कुठलाही अधिवास भव्य दिव्य बनत असतो. या छोट्या छोट्या वैविध्यांनाच मायक्रो हॅबिटॅट्स किंवा सुक्ष्म अधिवास असं शास्त्रीय भाषेत म्हटलं जातं. एका परिपूर्ण मोठ्या अधिवासासाठी या मायक्रो हॅबिटॅट्सचं अस्तित्वं अत्यंत महत्वाचं असतं. म्हणजे करोडो अणू रेणू पेशी एकत्र येऊन जसं एखादं शरीर बनवतात, तसंच.
मायक्रो हॅबिटॅट नक्की कशाला म्हणावं, याची व्याख्या करणं तसं अवघड आहे. एखाद्या गगनचुंबी वृक्षापासून, कोळ्याचं जाळं असलेलं तुमच्या घरातल्या कोपर्‍यापर्यंत, जिथे जिथे जीवनाला पोषक वातावरण आहे त्याला आपण मायक्रो हॅबिटॅट म्हणू शकतो. यातले काही अधिवास तात्पुरते तर काही कायमस्वरूपी असतात.
आपल्या घरापुरतं बोलायचं तर खूप उदाहरणं पाहायला मिळतील. पोरकीडे पोसणारे गव्हाचे डबे, पैशाचे कीडे, गांडूळं लपवणार्‍या फुलांच्या कुंड्या, शेवाळं पोसणार्‍या ओलसर भिंती, ढेकूण पाळणार्‍या गाद्या, पालीसाठी किडे उपलब्ध करून देणारी ट्युबलाईट वगैरे वगैरे वगैरे.
पण अस्सल नैसर्गिक म्हणाल तर या फोटोत दिसणार्‍या मायक्रो हॅबिटॅट सारखे असंख्य अधिवास सजीवांना तात्पुरत्या काळापुरतं का होईन अन्न आणि निवारा उपलब्ध करून देतात. पावसाळ्यात या दगडांमधल्या खळग्यांमधे पाणी साठतं. पाणी साठल्यावर त्यात दगडातले क्षार विरघळतात. मग शेवाळं, गवत वगैरे वनस्पती जम बसवतात. मग एखादी बेडकी येऊन त्यात अंडी घालते. पाण्यातल्या त्या समृद्ध सुक्ष्म अधिवासावर त्या पिल्लांचं जीवनचक्र पोसलं जाऊन मोठे बेडूक बाहेर पडतात आणि एक जीवनचक्र पूर्ण होतं. असे असंख्य सुक्ष्म अधिवास विविध प्रकारे, वर्षाच्या विविध कालखंडात या जीवसृष्टीचं चक्र फिरवत ठेवत असतात आणि निसर्गाचं पूर्णत्व अबाधित राखत असतात.
पंचेंद्रियं जागृत ठेऊन निसर्गात हिंडताना मला या पूर्णत्वाचं दर्शन वेळोवेळी घडत राहतं आणि शाळेत शिकलेल्या या श्लोकाची पदोपदी आठवण येत राहते.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ||

हेही पूर्ण, तेही पूर्ण, पूर्णाचे निर्माते पूर्ण,
पूर्णातुन पूर्ण काढिले, तरीही उरते ते पूर्णच.


मकरंद केतकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *