पॉईझन VS व्हेनम.

मंडळी, आपली मराठी भाषा व्यवहारात कितीही खमकी असली, तरी काही काही वेळा ती ‘वाघीणीच्या दुधाच्या तुलनेत’ चितळ्यांचं दुध वाटते. याला कारण मराठी ही इंग्लिशच्या तुलनेत बरीच नंतर विकसीत झाली आहे. त्यातून अनेक परकिय सत्ताधार्‍यांच्या प्रभावामुळे तिच्यात मुळच्या संस्कृत शब्दांच्या जोडीला फारसी, अरबी, पोर्तुगीज, इंग्लिश, उर्दू, हिंदी, कानडी अशा इतर भाषिक शब्दांची छान कोशिंबीर झालेली आहे. त्यामुळे मराठी बोला हे आग्रहाने म्हणताना ‘नवीन इंग्लिश शब्द वगळून बोला’ ही सुचनासुद्धा द्यायलासुद्धा हरकत नाही. असो. आजची पोस्ट आहे पॉईझन आणि व्हेनम यातल्या फरकावर. भारतीयच नाही तर फिरंगीसुद्धा सहजपणे अनेकदा दोन्ही शब्दांची गडबड करताना आढळतात. अगदी डॉक्टरकीच्या पुस्तकात सुद्धा सापांची माहिती देताना सापांना पॉईझनस म्हंटलेलं आढळतं. मराठीत तर दोन्हीला विषच म्हटलं जातं. म्हणूनच मला वाटतं की कुठलीही नवीन गोष्ट शिकताना बेसिक कन्सेप्ट्स क्लियर असणं फार गरजेचं आहे. सध्या आपण नैसर्गिकरित्या आढळणार्‍या दोन्ही गोष्टींची ओळख करून घेऊ.
पॉईझन म्हणजे काय?
पॉईझन म्हणजे स्पर्श, भक्षण, गंध आदी मार्गांनी शरीरात प्रवेश करून आपला तडाखा दाखवतो तो पदार्थ. अनेक प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या विविध अवयवांमध्ये नैसर्गिकरित्या हे विषारी पदार्थ सापडतात. उदा. जपानमध्ये अत्यंत महाग आणि चवदार समजला जाणारा फुगू (पफर फिश) ह्याच्या त्वचेत आणि लिव्हरमध्ये ‘टेट्रोडोटॉक्सिन’ नावाचं विष असतं जे सायनाईडपेक्षा १००० पट घातक असतं त्यामुळे त्याची डिश बनवण्यासाठी शेफकडे स्पेशल लायसन्स असणं आवश्यक असतं. दुसरं उदाहरण म्हणजे आपल्या परिचयाची तंबाखू जिच्या सेवनाने कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. एखाद्या गुहेत कोंडलेले वायू किंवा धूर हेसुद्धा विषारीच कारण त्यामुळे मृत्यू येतो. पॉईझनस प्राणी हे शक्यतो शांत स्वभावाचे असतात कारण त्यांना त्या विषाचा उपयोग फक्त स्वसंरक्षणासाठीच करायचा असतो. शिकारीसाठी नाही. पण ‘पुढे धोका आहे’ ही वॉर्निंग देण्यासाठी त्यांचे रंगदेखील अगदी भडक असतात.
आता व्हेनमची माहिती घेऊ.
व्हेनम म्हणजे असा विषारी पदार्थ जो रक्ताभिसरणातून शरीरात प्रवेश केल्यावर आपला इंगा दाखवतो. व्हेनम बाळगणारे बहुतांश प्राणी त्या जैविक रसायनाचा उपयोग शिकारीसाठी करतात. उदा विंचू, साप, कोमोडो ड्रॅगन्स, ऑक्टोपस, जेलीफिश, वास्पस वगैरे कारण त्यामुळे जसं त्यांचं भक्ष गतःप्राण किंवा पॅरलाईझ होतं, तसंच काही प्रकारच्या विषांमुळे भक्ष्याच्या शरीरातील टिश्युज विरघळायला लागून शिकार गिळल्यानंतर पचनास अधिक मदत होते. व्हेनम हा अनेक प्रकारच्या प्रकारच्या प्रोटीन्सचा सेट असतो जो भक्ष्याच्या किंवा हल्लेखोराच्या शरीरात गेल्यावर तिथल्या पेशींमध्ये घुसून बाँबसारखं काम करतो. माझ्या ओळखीतल्या काही डॉक्टरांचं म्हणणं आहे की व्हेनम जर पोटात गेलं तर आपल्याला काहीही होणार नाही उलट शरीराला प्रोटीन्स मिळतील. फक्त आतमध्ये कुठेही रक्तस्राव किंवा जखम नसावी. अर्थात हे खरं असलं तरी आपण त्यापासून लांब राहणंच आपल्या तब्बेतीला जास्त फायदेशीर राहील (आखीर अंदरकी बात कौन जानता है?).
तर असं आहे हे विषपुराण. आता यातला फरक अधिक चांगला लक्षात राहण्यासाठी शेवटचं सोपं उदाहरण.
खराब अन्न खाऊन आपल्याला काय होतं? द्या उत्तर.

मकरंद केतकर.

One Reply to “पॉईझन VS व्हेनम.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *