ढग VS धुकं

नेमेची येतो पावसाळा आणि येतं ढगा-धुक्यातलं कन्फ्युजन. सहसा जे जे तरंगणारं पांढरं त्याला आपण धुकं म्हणून मोकळं होतो. म्हणजे आपलं काय होतं ना .. हवेत तरंगणारी वाफ जमिनीवरून आकाशात पाहिली तर आपण त्याला ‘ढग’ म्हणतो पण त्याच वाफेत जर आपण डोंगरात जाऊन शिरलो तर आपण लगेच तिचं ‘धुकं’ करतो. तर आजचा प्रयत्न हा गोंधळ निस्तरण्याचा.
पृथ्वीच्या पोटाभोवती असलेल्या विषुववृत्तावरून व्यापारी वारे वाहत असतात. आपल्याकडच्या उन्हाळ्यामुळे जमीन प्रचंड तापते आणि हवेचे वर जाणारे (उर्ध्वगामी) प्रवाह निर्माण होतात. हेलियम भरलेले फुगे जसे वर जातात तसे. त्यामुळे जमिनीवर पोकळी निर्माण होऊन कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि ती पोकळी भरून काढायला समुद्राकडून हवा खेचली जाऊ लागते. हे सुरू झालं की ह्या व्यापारी वार्‍यांचा प्रवाह भारताकडे खेचला जातो (नैऋत्य मोसमी वारे) आणि ढगांचे तांडे समुद्रावरून जमिनीकडे सरकून आपल्याकडे मान्सून येतो. ह्यातला अरबी समुद्रावरून येणारा प्रवाह सह्याद्रीच्या अजस्त्र भिंतीला अडतो आणि त्यातल्या बाष्पाचं कंडेन्सेशन होऊन घाटमाथ्यावर आणि कोकणात प्रचंड पाऊस पडतो. हे ढग जेव्हा डोंगरमाथ्यांवर जमिनीच्या लगत येतात तेव्हा ते काळे न दिसता पांढरे दिसतात आणि म्हणून त्याला सर्वसामान्य भाषेत धुकं म्हटलं जातं. पण खरंतर हे ढगच. उन्हाचा आणि उष्णतेचा ह्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
पावसाळा आटोपल्यावर सुरू होतो ‘ऑक्टोबर हीट’चा महिना. पावसाळा आणि हिवाळा ह्या दोन ऋतूंच्या स्थित्यंतरामधला हा काळ. ह्या दरम्यान ढगांचं आवरण नाहीसं झाल्याने आणि सूर्यकिरण थेट जमिनीवर पोहोचू लागल्याने जमिनीतली उष्णता वाढते आणि जमिनीत मुरलेल्या पाण्याची वाफ व्हायला लागून हवेतला दमटपणा जास्त जाणवू लागतो. ऋतूचक्र हिवाळ्याकडे सरकल्यावर हेच बाहेर पडणारे बाष्प जमिनीलगत कंडेंन्स होऊ लागते आणि नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास धुके साचू लागते. एवढंच कशाला अगदी पुण्यातही हिवाळ्यात पहाटे एकमेकांशी बोलताना तोंडातून येणारी वाफ दिसू लागते. धुक्याचा ‘ड्यू पॉईंट'(म्हणजे हवेचं लघुत्तम तापमान) सहसा पहाटे अचिव्ह होतो. त्यामुळे रात्री क्लियर असलेली हवा चार पाचच्या सुमारास अगदी पांढरीशुभ्र होऊन जाते आणि ऊन येईपर्यंत स्थिती कायम राहते. अशाप्रकारे जोपर्यंत ह्या जमिनीलगत मुरलेल्या पाण्याचा बाष्परूपात पूर्णपणे निचरा होत नाही तोपर्यंत हे धुकं हिवाळ्यात साचत राहतं.
थोडक्यात काय तर आकाशात तरंगणारे बाष्प जमिनीवर उतरले की त्याला ढग म्हणायचं आणि जमिनीतून बाहेर आलेले बाष्प जमिनीलगतच साचले तर त्याला धुकं म्हणायचं.

मकरंद केतकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *