जळूचा जलवा.

उन्हाळ्यात मला अनेकांनी काजव्यांवर लिखाण करायला सांगितल्यावर विचार केला की एवढे काजवे महोत्सव भरतायंत तर त्यात जाऊन जाऊन एव्हाना अनेकांना ‘ल्युसिफेरीन आणि ल्युसीफेरज’च्या ऑक्सिडेशनबद्दल माहिती कळलीच असेल. त्यामुळे तो मोह मी टाळला. पण म्हटलं की पावसाळी भटकंती सुरू झालीय तर प्रिय जळूवर काहीतरी लिहावे.
तर, आपल्या सर्वांच्या परिचयाची असलेली ही जळू, ‘हर्माफ्रोडाईट’ म्हणजे अर्धनारीनटेश्वर ह्या प्रकारात येते. गोगलगायी, गांडूळं, स्लग्स हे सुद्धा ह्याच वर्गातले सदस्य. आपल्याकडे कोरड्या दिवसांत सुप्तावस्थेत असणारी आणि पावसाळ्यात सक्रिय होणारी जळू फार प्राचीन काळापासून वैद्यकशास्त्राच्या इतिहासात मोलाचे स्थान मिळवून आहे. तिच्या रक्त पिण्याच्या गुणधर्मामुळे, गळू किंवा रक्त साकळलेल्या भागावर जळू लावून तिथलं दूषीत रक्त काढून टाकण्याच्या कामावर तिला नेमलं जायचं आणि अजूनही जातं. आमच्या ओळखीच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांच्याकडे पाणी भरून ठेवलेल्या बरणीतल्या जळवा पहात बसणं हा माझा बालपणापासूनचा आवडता उद्योग आहे.
जळूचं वर्गीकरण दोन प्रकारात केलं जातं.

१) र्‍हिंकोब्डेलीडा (rhynchobdellida)

२) अर्‍हिंकोब्डेलीडा (arhynchobdellida).

[rhynchus – “beak / चोच” | bdella – “leech / जळू”]
र्‍हिंकोब्डेलीडा प्रकारातल्या जळवांना तोंडामध्ये लवचिक सुईसारखा अवयव असतो ज्याच्याद्वारे त्या रक्त शोषून घेतात. अर्‍हिंकोब्डेलीडा ह्या प्रकारातल्या जळवांच्या तोंडात धारदार पाती असतात ज्यांचा वापर करून त्या त्वचेला छेद देतात आणि रक्त शोषून घेतात. ह्या प्रकारातल्या जळवांनी रक्त शोषायची जागा सोडल्यावर तिथे मर्सिडीजच्या चिन्हासारखी खूण दिसते. जळूच्या शरीराच्या दोन्ही टोकांना दातेरी अवयव असतात ज्याचा उपयोग तिला होस्टच्या शरीरावर स्वतःला अँकर करण्यासाठी होतो. एकदा का शेपटीच्या दाताने स्वतःला होस्टच्या त्वचेवर अँकर केलं की जळू तोंडाच्या भागाने त्वचेला छेद देते व हिरूडीन नावाचे रसायन जखमेत सोडते ज्यामुळे खपली धरण्याची प्रक्रिया होत नाही व रक्त प्रवाही राहतं. इवलीशी जळू सुमारे अर्धा तास रक्त प्यायल्यानंतर चांगली दसपट मोठी होते व आपोआप गळून पडते. (त्वचेवर चिकटेलेली जळू काढून टाकण्यासाठी मीठाचा उपाय करून पाहावा). हिरूडीनचा प्रभाव कमी झाला की जखमेवर खपली धरण्याची प्रक्रिया परत सुरू होते. जळूच्या विविध जातींनुसार जखमेच्या ठिकाणी रिअ‍ॅक्शन येणार की नाही येणार हे ठरतं. माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार एक दोन दिवस किंवा फार तर आठवडाभर जळू चावलेल्या ठिकाणी कंड सुटत राहते व नंतर थांबते. पण काही जणांमध्ये ह्या काळात तिथली त्वचा जरा खराब झाल्यासारखी दिसू शकते. ह्यानंतर जळू अनेक महिने हे रक्त पचवत राहते. अन्न न मिळाल्यास जळू वर्षभर उपाशी राहू शकते. वर म्हटल्याप्रमाणे जळू ही हर्माफ्रोडाईट असून दोन्ही जळवा मिलनकाळात एकमेकांच्या शरीरात शुक्राणू सोडून एकमेकांच्या शरीरातील अंड्यांना फलीत करतात. ह्यानंतर जळू त्वचेचाच एक कोष बनवून त्यात अंडी घालते व तो कोष ओलसर जागी दगडाला किंवा खोडाला चिकटवून देते. यानंतर काही आठवड्यांनी कोषातून पिल्लं बाहेर येतात व प्रौढांप्रमाणेच रक्तपिती होतात. कोयनेच्या जंगलात हिंडताना फांद्याफांद्यांवरून अंगावर झेपावणार्‍या जळवा आठवल्या की अजूनही काटा येतो. पाण्यात राहणार्‍या काही जळवा रक्त न पीता गोगलगायी, गांडूळं व किटकांच्या पिल्लांना खातात. जळवांचे मुख्य शत्रू म्हणजे कासवं, पक्षी, मासे इ. जे त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात.
जळूचा निसर्ग परिसंस्थेतला रोल आपल्या दृष्टीने थोडा विचित्रच आहे. पण बिचारी कशीही असली तरी तिला पाहिल्यावर ‘अशी ही बनवाबनवी’ मधल्या ‘विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत’ ह्या संवादाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही हेही तितकंच खरं.

मकरंद केतकर.
(फोटो गुगलवरून साभार).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *