जंगल समजून घेताना.

दराच तुटला मोठा । झाड खंडे परोपरी ।
निबीड दाटली छाया । त्यामधे वोघ वाहाती ||

गर्जती स्वापदे पक्षी । नाना स्वरे भयंकरे ।
गडद होतसे रात्री । ध्वनीकल्लोळ उठती ||

रानाचं वर्णन करताना समर्थ रामदासांनी अत्यंत मोजक्या शब्दात अरण्याची गुढता आणि भयानकता चपखलपणे लिहून ठेवलेली आहे. पण खरं सांगायचं, तर हा जंगलाबाहेर राहणार्‍या किंवा जंगलाच्या परिभाषेशी अपरिचीत असलेल्या लोकांचा दृष्टीकोन आहे. याउलट रानात राहणारे आदिवासी रानाबाहेर राहण्यास राजी नसतात. ज्या जंगलाने आपल्या गरजा पुरवल्या ते जंगल त्यांना परकं कसं वाटेल? त्यामुळे एकीकडे जंगलाला भ्यायचं आणि दुसरीकडे कुठल्यातरी कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपणाचे फोटो छापून आणून प्रसिद्धी मिळवायची, हे विरोधाभासी वर्तन मला अनेकदा लोकांच्या वागण्यातुन दिसतं. ज्यांनी जंगल अनुभवलं आहे, त्यातली शिस्तबद्धता पाहिलेली आहे त्यांना वरील ओळींमधलं खरं सौंदर्य अधिक चांगल्या पद्धतीने जाणवतं. सर्वप्रथम जंगल का जाणायचं हे आधी जाणलं पाहिजे. प्राथमिक पुस्तकांमधून आपण अनेकदा पाठ केलेलं असतं की जंगलातून अमुक मिळतं, तमुक मिळतं वगैरे वगैरे. पण पैशाचा ओघ आयुष्यात वाहू लागला की मग आयुष्याचा पाया असणारी ही मायबाप जंगलं प्रगतीच्या आड येऊ लागतात. शहरी चैनीच्या परंपरा जंगलाला मानवत नाहीत हे विसरलं जातं, जंगलाचा व त्यातल्या जीवांचा विचार केला जात नाही आणि मग प्रॉब्लेम्स कॉम्प्लिकेट होत जातात. उदा. सिंहगडाच्या पायथ्यपासुन गडापर्यंत रोप-वे करण्याचा मध्यंतरी घाट घातला जात होता. अर्थात हे होणार होतं काही हेक्टर समृद्ध जंगलाचा बळी देऊन. आणि त्याची भरपाई काय तर कोकणात कुठेतरी वनखात्याच्या जागेत तेवढीच झाडं लाऊन ‘बॅलन्स’ केला जाणार होता.
खरंच इतकं सोपं असतं का हो हे सगळं? वृक्षारोपण केलं म्हणजे जंगल झालं का तयार? एका झाडाच्या पडण्यामुळे कोणावर, किती आणि कसा फरक पडतो? हे सगळं आपण एका पक्ष्याच्या उदाहरणावरून बघू.
पक्षी म्हटला की तो रात्री घरट्यात झोपतो हा अनेक कवीकल्पना ऐकून झालेला अनेकांचा गैरसमज आहे. एकतर पक्षी फक्त पिल्लं वाढवण्यासाठी घरटी करतात. त्यातून सगळेच पक्षी घरटी करत नाहीत. काही जमिनीवर अंडी घालतात तर काही ढोल्यांमधे. त्यातसुद्धा काही जण चोचीने ढोल्या कोरतात तर अनेक जण नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पोकळ्या या कामासाठी वापरतात. या आयत्या ढोल्यांमधे घर करणार्‍यांपैकी एक आहे धनेश. धनेशच्या आपल्या (म्हणजे सह्याद्री) भागात चार जाती आढळतात. राखी धनेश, मलबार राखी धनेश, मलबार अबलख धनेश आणि मोठा धनेश. मोठा धनेश हा चोचीपासून शेपटीपर्यंत साधारण चार फूट लांब असतो. आता एवढा मोठा पक्षी त्याच्या विणीसाठी ढोलीत शिरणार म्हणजे त्या झाडाचा बुंधा तेवढा मोठा असला पाहिजे. एवढा मोठा बुंधा असलेलं झाड अस्तित्वात असण्यासाठी ते जंगलही तितकच जुनं हवं. म्हणजेच माणसाने आपल्या वापरासाठी असे वृक्षोत्तम असलेलं जंगल न तोडता ते राखलेलं असायला हवं. तरच या पक्ष्यांना आपली प्रजा वाढवण्यासाठी निवारा उपलब्ध होईल. समजा हे वृक्ष आपण काढून टाकले तर काय होईल? तर अर्थातच या धिप्पाड पक्ष्यांचा निवारा हिरावून घेतला जाईल. त्यांची प्रजोत्पत्ती होणार नाही. त्यामुळे त्यांची संख्या कमी होईल. हे पक्षी बीजप्रसाराचं फार मोठं काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेली जंगलाची व्यवस्था कोलमडेल आणि त्याचा कुठलातरी विपरीत परिणाम शेवटी मनुष्यजातीला भोगायलाच लागेल. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आपण जंगल तयार करू शकत नाही. जंगल तयार होणे ही अत्यंत क्लिष्ट गोष्ट आहे. एक सुदृढ जंगल तयार व्हायला किमान हजार वर्षांचा कालावधी लागतो. म्हणून आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपण वनीकरण नाही तर फक्त वृक्षारोपण करू शकतो.
थोडक्यात काय तर जंगल ही घाबरायची किंवा भीतीदायक जागा नाहीये. तर आपलं आयुष्य दीर्घ करणारी ही निसर्गाची फार मोठी देणगी आहे. आपला श्वास चालू ठेवणारी ती बॅटरी आहे. म्हणूनच त्याची कार्यपद्धती आणि त्यावर अवलंबून असलेलं आपलं जीवन यांची सुजाण बुद्धीने सांगड घालणे व त्याची जपणूक करून आपल्या भावी पिढ्यांसाठी समृद्धतेचा वारसा जपणे एवढेच करण्यापलीकडे आपल्या हातात काय आहे?

मकरंद केतकर
(फोटो: Sanctuary Asia पेज वरुन साभार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *