क्लायमेट vs वेदर

काल कोरीगडावर गेलो असताना खूप म्हणजे खूप जणांना, ‘काय क्लायमेट आहे यार गडावर’ असं म्हणताना ऐकले. मला खात्री आहे, तुमच्यापैकीही अनेकजण सुंदर वातावरणाचं वर्णन करताना हाच शब्द वापरत असतील. पण खरंतर त्या हवामानासाठी क्लायमेट हा शब्द वापरणं चुकीचं आहे.
क्लायमेट म्हणजे एखाद्या भौगोलिक स्थानाची दीर्घकालीन सरासरी तापमान स्थिती. ह्यात आर्द्रता, उष्णता, वारा, पाऊस वगैरे घटकांचा किमान पंचवीस तीस वर्षे अभ्यास करून काढलेला ॲव्हरेज असतो. उदा. काश्मीरचं तापमान थंड आहे, महाराष्ट्राचं उष्ण आहे इ.
याच्या विरुद्ध वेदर असतं. वेदर म्हणजे हवामान. वेदर हे अगदी बेभरवशाचं असतं. तुमच्या आजूबाजूची स्थिती अगदी एका मिनिटात सुद्धा चेंज होऊ शकते. आत्ता ऊन आहे तर पुढच्या क्षणाला आभाळ गडद होऊन पाऊसही येऊ शकतो.
तापमान म्हणजे रुळांवरून चालणारी रेल्वेगाडी. एका सरळ रेषेत चालणारी. तर हवामान म्हणजे पट्टा घालून फिरायला नेलेला कुत्रा. जो कधीच सरळ रेषेत चालत नाही. कधी इथे तर कधी तिथे.
याहूनही लक्षात ठेवायची अगदी सोपी गोष्ट म्हणजे बातम्यांमध्ये नेहमी ‘वेदर रिपोर्ट’ किंवा ‘हवामान अंदाज’ देतात. क्लायमेट रिपोर्ट नाही. तेव्हा यापुढे कधीही कुठेही फिरायला गेलात आणि अगदी आल्हाददायक वातावरण असेल तर ‘काय छान वेदर आहे’ असंच म्हणायला विसरू नका.

मकरंद केतकर.
फोटो: Chaitanya Risbud

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *