एका वृक्षाचं विश्व

केशवसुत म्हणतात, “या विश्वाचा आकार केवढा-ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा.” मला तर पुढे जाऊन विचारावसं वाटतं की ‘डोक्याएवढा का कुतूहलाएवढा?’ काय काय आहे या विश्वात आणि काय काय दडलंय त्यातल्या प्रत्येकाच्या विश्वात? नुसत्या एका वटवृक्षाचं अर्धा तास निरीक्षण केलं तर माझी मती गुंग झाली. असंख्य छोट्या छोट्या इकोसिस्टिम्स कशा काय एकसंधपणे नांदू शकतात याचं उत्तम उदाहरण हा वृक्ष होता. वृक्षाच्या मुळांपाशी, त्याच्या छाया आणि त्यामुळे राहिलेल्या ओलाव्यामध्ये शेवाळं उगवलेलं होतं. त्यातलं थोडसं शेवाळं किंचीत वर उचलून पाहिलं तर अनेक सुक्ष्म किटक त्याच्याखाली वावरत होते. या किटकांना खायला आलेले काही किटकभक्षी इतर किटक तिथे आजूबाजूला वावरत होते. मुळांच्या जवळ असलेल्या एका छिद्रामधून एक मुंग्यांची रांग हालचाल करत होती. तिथेच मुळांपाशी फनेल वेब स्पायडरचं जाळं होतं ज्यात काही मुंग्या अडकलेल्या होत्या. तिथून थोडं वर खोडावरती ब्रॅक फंगस उगवलेलं होतं जे खोडामधल्या मृत पेशींचं विघटन करायचं काम करत होतं. खाली पडलेल्या पाचोळ्यामधून, पाचोळ्याचं खतात रूपांतर करणारे पील मिलीपीड्स आणि त्यांच्याच ‘मायरियोपोडा’ या क्लासमधले मेंबर्स असलेले शिकारी सेंटीपीड्स म्हणजे ‘गोम’ फिरत होते. ‘डेट्रीटीव्होरस’ म्हणजे असाच पालापाचोळा आणि मृत खोड,फांद्या खाऊन जगणार्‍या वाळवीचं एक छोटूसं वारूळ तिथे शेजारीच होतं. या सगळ्यांमुळे तिथे ह्युमस तयार होऊन तिथल्या मातीचा कस वाढत होता. आजूबाजूच्या मातीत आणि दगडांच्या आसपास खेकड्यांची व उंदरांची बिळं होती. झाडाच्या खोडावर असलेल्या कपच्यांच्या मागे ‘चिलोनिथी’ फॅमिली मधले स्युडोस्कॉरपियन्स नावाचे जेमतेम अर्धा मिलीमिटर लांबीचे किटक राहात होते. झाडाच्या फांद्यांवरती अनेक पक्षी होते. त्यातले काही खोडामधले किडे शोधत होते तर काही फांद्यापानांमध्ये लपलेले किडे शोधत होते. त्यांच्या चोचींच्या आकारातला फरक त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल खूप काही सांगत होता. शाखांच्या वरच्या भागात एक रिकामं घरटं होतं. बहुदा शिकारी पक्ष्याचं असावं. त्याच्या काठावरती व खाली त्याच्या पिल्लांनी केलेली ‘विष्ठा’ होती. या विष्ठेमुळे तिथल्या मातीचा कस वाढायला किंचीतसा ‘शीटभार’ लागला होता. तसेच या विष्ठेमुळे फक्त विष्ठेचं विघटन करणार्‍या बॅक्टेरियांना आणि बुरशीला अन्न मिळालं होतं. झाडाच्या खोडावर वुली बेअर मॉथचा एक सुरवंट होता. तो त्या वृक्षोत्तमावरच बहुदा कोष विणून मेटामॉर्फोसिस पूर्ण करणार असावा. तसेच खोडावर सिकाडाची एक रिकामी खोळही होती. कदाचीत त्याच वृक्षाच्या भूमीगत मुळांमधून रस पित त्याचं कित्येक वर्षांचं बालपण पार पडलं असावं आणि प्रौढावस्था आल्यावर मातीतून बाहेर येऊन, खोडावर बसून कात टाकून त्याने त्या वृक्षाचा निरोप घेतला असावा.
असं हे धावतं, वाढतं, सरतं जग एका वृक्षाभोवती नांदत होतं व त्या वृक्षाची तोड न झाल्यास पुढची शेकडो वर्ष नांदत राहील. या शेकडो वर्षात कोट्यवधी पानं गळतील, हजारो फांद्या धराशायी होतील. झाडावरचे पक्षी मातीस मिळतील. या सगळ्यांना मातीत सामावणारे किटकही मातीत सामावतील. झाडाच्या मुळांवरचे सुक्ष्म बॅक्टेरिया हवेतला नायट्रोजन मातीत मिसळून ती माती अजूनच कसदार करतील. त्यामुळे झाडाला एनर्जी मिळून त्यावर दरवर्षीप्रमाणेच लक्षावधी फळं उगवतील व अनेक पशूपक्षीकिटकांना अन्न पुरवून तो वृक्ष बीजप्रसार करायला लावेल. परंतु या चक्राचीही गती एक दिवस संपुष्टात येईल आणि तो वृक्ष उन्मळून पडेल. पुन्हा एका नव्या पद्धतीच्या चक्राला जन्म देण्यासाठी.

मकरंद केतकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *