अगंबाई अरेच्चा! (उभयलिंगी उर्फ हर्माफ्रोडाईट्स)

कशी गंमत असते ना? आपल्याला वाटतं की सगळं आपल्यासारखंच असतं. पण ते तसं नसतं तेव्हा चमत्कार लोकप्रचलित होतात. म्हणजे जेव्हा मी सांगतो की काही साप पार्थिनोजेनेटीक असतात म्हणजे त्यांच्या कुळात सगळं महिला मंडळच. अहोंचं अस्तित्वच नाही, तर लोकं म्हणतात हॅ! असं कुठे असतं का. जेव्हा मी सांगतो की बेडकांचं प्रजनन एक्स्टर्नल फर्टिलायझेशनने होतं, म्हणजे मादी अंडी घालते आणि नर तिच्या पाठीवर बसून त्यात शुक्राणू सोडतो, तेव्हाही लोकं डोळे विस्फारतात. आणि आता जर मी सांगितलं की गोगलगायी म्हणजे स्नेल्स आणि त्याच प्रकारातले स्लग्स ह्यांच्या ‘मोस्ट ऑफ द स्पिशी़ज’मधे एकाच शरीरात नर आणि मादी दोघेही असतात तर तुम्ही आश्चर्याने काय म्हणाल? अगबाई! आणि अरेच्चा! पण खरोखरच या प्रकारांमधे हे ‘अगबाई आणि अरेच्चा’ एकाच शरीरात राहतात.
अशा प्रकारे प्रजनन करणार्‍या जीवांना ‘हर्माफ्रोडाईट्स’ असं म्हणतात. इतरवेळी भूमीगत असणारे हे जीव पावसाळा आला की जमिनीवर येतात आणि खाद्य आणि प्रजननाच्या कामाला लागतात. त्यांना त्यांच्या वावरासाठी ओलसर जमिन आवश्यक असते कारण त्याच्या आधारे त्यांच्या शरीरातून स्रवणारा चिकट द्राव त्यांना पुढे घसरत जायला मदत करतो. जेव्हा ‘मीलन की घडी’ जवळ येते तेव्हा हा स्राव हुंगून एकमेकांना शोधलं जातं. जवळ आल्यावर दोघेही जण एकमेकांच्या भोवती घिरट्या घालून ‘कितपत तयारी’ आहे याचा अंदाज घेतात. आपापल्या शरीरातले मियां बीवी (किंवा बीवी मियां .. काय फरक पडतो?) राजी झाल्यावर दोघेही शेजारी शेजारी एकमेकांना पार्क करतात आणि प्रेमाने एकमेकांना उत्तेजित करतात. उत्तेजित झाल्यावर दोघांचही लिंग बाहेर येतं आणि जातीप्रजातीच्या रचनेनुसार ते एकमेकांना इमप्रेग्नेट करतात. काही जातींमधे दोन्ही लिंग एकमेकांना भिडवून शुक्राणू एकमेकांमधे ट्रान्सफर केले जातात. मी पाहिलेल्या या स्लगच्या प्रजातीमधे शरीराच्या मध्यभागी बाह्यबाजूला एक खाच असते जी ‘बाईचं’ काम करते आणि मानेजवळून लिंग बाहेर येतं. मग दोघेही एकमेकांच्या शेपट्यांकडे तोंड करतात आणि ‘घुंघट उठा रहा हूं मै’ म्हणायला लागतात. मी पाहिलेली ही प्रोसेस साधारण दहा मिनिटं चालू होती. त्यानंतर दोघेही वेगळे झाले आणि आपापल्या वाटेने निघून गेले. अशाप्रकारे मीलन झाल्यावर साधारण महिन्याभरात पालापाचोळा किंवा ओंडक्यांखाली अंडी घातली जातात.
संथपणे स्वतःच्याच शेंबडावर स्लाईड होत जाणार्‍या या स्लगस् च्या मनात एकमेकांना पाहिल्यावर काय खळबळ होत असेल याचा तसा अंदाज येणं कठीण आहे पण तरी मी या दोघांच्या वतीने एक गाणं तमाम ‘हर्माफ्रोडाईट्स’ना समर्पित करत आहे.

तर म्हटलंय बरं का …

मौसम हा सुहाना सख्या कशाला दुनियेची भ्रांत,
मौसम हा सुहाना सख्या कशाला दुनियेची भ्रांत,
चिकट सुगंधाने केलंय दिवाना,
आता मीच तुझी कांता आणि मीच तुझा कांत.


मकरंद केतकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *