तद्रुप

नट्टापट्टा करणं, प्रभावी व्यक्तींसारखा पोषाख वापरणं ही ‘आकर्षक दिसण्यासाठी किंवा दरारा निर्माण करण्यासाठी’ केली जाणारी खटपट फक्त माणसांपुरतीच मर्यादीत नाही. निसर्गातला प्रत्येक जीव त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीशी तद्रुप होण्यासाठी उत्क्रांतीने बहाल केलेल्या गुणधर्मांचा यथायोग्य वापर करत असतो. यामधे जसं स्वसंरक्षण अपेक्षित आहेत तसंच भक्ष्याला फसवून उदरभरणही घडवून आणण्यासाठी आहे. सजीवांमधे रंग, आकार, आवाजी नकला या माध्यमांद्वारे हेतू साध्य केला जातो. आपल्या आसपास असलेली आणि सहज दिसू शकणारी काही उदाहरणं बघू.

आवाजी नकला:- उदाहरण द्यायचंच झालं तर आपल्या नेहमीच्या परिचयाचा कोतवाल पक्षी अत्यंत हुबेहुब शिक्रा तसेच इतर शिकारी पक्ष्यांचे आवाज काढून इतर पक्ष्यांना फसवतो. यामुळे धोक्याच्या जाणीवेने इतर पक्षी त्या जागेपासून लांब पळ काढतात आणि कोतवालाला उदरभरणामधे स्पर्धा कमी होते.

रंग:- कॉमन हॉक कुकू म्हणजे ‘ब्रेन फीव्हर’ हा पक्षीसुद्धा शिक्रासारख्या शिकारी पक्ष्याच्या रंगरूपाची नक्कल करतो जेणेकरून इतर पक्षी भीतीने दूर राहावेत. बगळ्यासारखा दिसणारा पाँड हेरॉन उर्फ वंचक हा पक्षी अगदी गटारं आणि नाल्यांमधेही सुखनैव विहरतो. फक्त तो उडून एका जागी बसला की मात्र त्याला लोकेट करणं जरा अवघडंच जातं. त्याच्या अंगावरच्या तपकीरी रेषा आजूबाजूच्या मातकट रंगात बेमालूम मिसळून जातात. साप हे तर रंगरूपाच्या बाबतीत ‘मास्टर्स ऑफ कॅमफ्लॉज’ आहेत. अनेक अंधश्रद्धांमधून अत्यंत परिचयाचा असलेला निरूपद्रवी हरणटोळ हा एखाद्या वेलीसारखा शेलाटा आणि शिडशिडीत असतो. एवढंच नव्हे तर वार्‍यावर हलणार्‍या वेलीप्रमाणेच तोही मागे पुढे होत सावधपणे एका झाडावरून दुसर्‍या झाडावर जात असतो. रंगबदलू कमेलियन सरडा त्याच्या त्वचेतील पेशींमधली रंगद्रव्य बदलून भवतालशी चटकन मिसळून जातो. गवतात लपणारे नाकतोडे व काडी-किटक हे सुद्धा ‘मायावरणाच्या खेळातले’ बाप खेळाडू. काडी किटक उर्फ स्टिक इनसेक्ट हा तर अक्षरशः गवताची वाळलेली काडीच असल्यासारखा भासतो. फुलपाखरांमधे ब्लु ओकलीफ हे फुलपाखरू तर अगदी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही दिसतं. फक्त ते पंख मिटून बसल्यावर तुम्हाला वाळलेल्या पानापासून त्याला वेगळं ओळखता आलं पाहिजे. फुलपाखरांचे सुरवंटही या बाबतीत अत्यंत हुशार असतात. उदा. कॉमन मॉरमॉन या फुलपाखराच्या सुरवंटाच्या पाठीवर डोळ्यासारखे दोन मोठ्ठे काळे ठिपके असतात. त्यामुळे शत्रुची फसवणूक होते. कॉमन बॅरॉन या फुलपाखराचा सुरवंट तर अक्षरशः पारदर्शक काचेसारखाच दिसतो त्यामुळे आंब्याच्या पानामागे तो लपलेला असताना दिसणं निव्वळ अशक्यच. वनस्पतींच्या बाबतीत बोलायचं तर पावसाळ्यात सह्याद्रीत फुलणार्‍या ‘बी ऑर्किड’च्या फुलाची पाकळी हुबेहुब मधमाशीच्या रंगरूपाची नक्कल करते. पावसाळ्यात दगडावर पसरणारं दगडी रंगाचंच बुळबुळीत शेवाळंही त्यातलाच प्रकार. दिसतच नाही आणि मग पाय ठेवला की साष्टांग नमस्कारच.

खरं सांगायचं, तर या उदाहरणांना काही अंतच नाही. निसर्गातला प्रत्येक जीव स्वत:च्या बचावासाठी अगदी एखादातरी तद्रुप होण्याचा गुणधर्म घेऊन जन्माला आलेला असतो. निसर्गाच्या या कलाकारीला मनापासून दाद ही त्यांच्या निरिक्षणामधूनच दिली जाऊ शकते. तुमच्याही आसपास असे अनेक लपंडाव खेळणारे जीव वावरत आहेत. त्यांना हुडकून त्यांच्या नोंदी करू शकाल?


मकरंद केतकर
www.insearchoutdoors.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *