रानभूल

दिवस दिवस (म्हणजे सोमवार ते शुक्रवार) काम केल्यानंतर कुठल्यातरी गडावरची नाहीतर गुहेमधली देवी स्वप्नात येतेच येते आणि मग कोप होऊ नये म्हणून ‘माताके बुलावा’ को ओ दिल्याशिवाय गत्यंतर नसतं. चारेक वर्षांपूर्वी मे महिन्यातल्या अशाच एका विकेंडला कर्जत (जि. रायगड) जवळच्या ढाकबहिरीच्या गुहेतल्या देवीने स्वप्नात दृष्टांत दिला की माझ्या डोंगरावरच्या गुहेत ये. तिथे थंडगार तीर्थ आणि खूप भारी ‘शीनशिनरी’ आहे. आता खुद्द हाय कमांडकडूनच ऑर्डर आल्यावर नाही थोडीच म्हणणार? ताबडतोब दोन चार मित्रांना फोन लावले. त्यातले तिघे भक्त ‘डन’ झाले. मुक्कामी यात्रेचा प्लॅन झाला. पोर्टेबल गॅस सारख्या आधुनिक उपकरणांची खरेदी झाली आणि चौकडी ‘तीर्थ’यात्रेला निघाली. बाबासाहेब पुरंदरे म्हणतात “वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही”. पण ‘वेड लागणं’ आणि ‘वेड्यासारखं वागणं’ यात समुद्रसपाटीपासून अडीच हजार फुटांचं अंतर आहे हे कळेपर्यंत फार उशीर म्हणजे संध्याकाळचे सात वाजून गेले होते.
ढाकबहिरीच्या डोंगरातली ही गुहा नाथपंथियांची असावी असं म्हणतात. सणसणीत उंच कातळकड्यावर मध्यभागी आयताकृती खणलेली आणि पोचायला महाकठीण ही गुहा म्हणजे एकांतात देवाशी संवाद साधायला आणि पाऊल चुकलं तर देवाची भेट घ्यायला यथायोग्य स्थान आहे याची तिथे पोचल्यावर खात्रीच पटते. भरगच्च जंगल सोडलं तर तसं इतर काही पाहण्यासारखं नाही त्यामुळे थोडा त्रास झाला तरी चालेल पण संध्याकाळपर्यंत गुहेत मुक्कामी पोहोचू आणि सकाळी निघू असं (चुकीचं) नियोजन झालं. त्यानुसार पायथ्याच्या सांकशी गावात आम्ही पोहोचलो आणि भर दुपारी तीन-साडेतीनला योग्य दिशेला ‘चुकीचं’ पाऊल पडलं.
मी अनेक वर्षांपूर्वी इथे आयुष्यातला पहिला ट्रेक म्हणून इथे आलो होतो. त्यामुळे त्यामुळे वाट शोधावी लागणार होती. मी स्मरणशक्तीला ताण दिला आणि समोरच्या मांजरसुंब्याच्या डोंगराकडे आम्ही चालू लागलो. वाटेत एका ठिकाणी दगडावर बाण रंगवलेले दिसले आणि मग बरोब्बर रस्ता सापडला. फार नाही पण साधारण चाळीसेक डिग्री तापमान, सावली नाही, खडी चढण आणि पाठीवर छोट्या सिलेंडरचं ‘विकतचं दुखणं’ घेऊन आमची मिरवणूक एकेक टप्पा पार करत शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली.
आता खरी कसोटी होती. अजून थोडा उजेड होता. आम्ही ठळक पायवाट पकडून जंगलात घुसलो आणि फसायला लागलो. प्रत्येक वाट खरी वाटत होती आणि मायावी राक्षसांसारखी जवळ बोलावून जंगलात अदृश्य होत होती. चार पाच वाटा हिंडून आलो पण आता डोकं गरगरायला लागलं. सूर्याची पश्चिम क्षितिजाशी चाललेली हितगूज, अतिशय दाट जंगल, वाट सापडत नाही, पाण्याचा ठावठिकाणा माहित नाही आणि सोबत आणलेलं पाणी संपत आलेलं अशा बेक्कार सिच्युएशनमधे आम्ही अडकलो होतो. शेवटी निर्णय घेतला की एखाद्या मोकळ्या जागेत पथारी पसरावी आणि सकाळी पुन्हा प्रयत्न करावा. त्याप्रमाणे मोकळ्या जागेत चादरी अंथरल्या. पाणी नसल्याने अन्न शिजवण्याचा प्रश्नच नव्हता. मी आणि एका मित्राने जाऊन पिशवीभर करवंद गोळा करून आणली. जमिनीत आणि हवेतही प्रचंड उष्णता होती. वारासुद्धा दिवसभराचं काम आटपून कुठेतरी विसावला होता. त्यामुळे संध्याकाळी सातनंतर सरकारी कार्यालयं दिसतात तसं ते जंगल भकास वाटायला लागलं. एक एक प्रहर पाण्याच्या विरहात जात होता. उरलेलं पाणी बुचाबुचाने वाटून घेत होतो. समोर गुहा दिसत होती. पण आपल्याच कोपराचं चुंबन घेण्याइतकी ती अवघड गोष्ट वाटत होती. झोप तर नव्हतीच. टॉर्चच्या प्रकाशात झाडांच्या सावल्या पांघरून कशीबशी रात्र काढली. पहाटे आम्ही नव्या उत्साहाने शोधमोहिमेला लागलो आणि काय आश्चर्य! पहिल्याच घटक्यात वाट सापडली. अतिशय अवघड टप्पे पार करून आम्ही वर पोहोचलो आणि पोटभर पाणी प्यायलो. आपल्या देशात पाण्याला ‘तीर्थ’ का म्हणतात याचा साक्षात्कार झाला. जगाच्या शाळेत आपण आधी ‘शिक्षा’ भोगतो आणि नंतर ‘धडा’ शिकतो. इथे सह्याद्रीने तर आम्हाला थेट परीक्षेलाच बसवलं आणि नशिबाने आम्ही काठावर पास झालो. नेहमीप्रमाणेच.
मकरंद केतकर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *