झाकले माणिक

या जगात काही व्यक्ती अत्यंत निर्भेळ आगाऊ असतात. आपली क्षमता, दर्जा आणि उपयुक्तता यांची त्यांना जाणंच नसते. पण त्यांचा अट्टाहास इतका पराकोटीचा असतो की त्यांच्यासोबत एकदा अनुभव घेतलेली मंडळी पुढच्या प्रत्येक भटकंतीत नवीन माणसांना सोबत घेताना ‘वाहन आपल्या जबाबदारीवर लावावे’ या सुचनेसारखीच सदैव सावध होऊन जातात. हे सगळं सांगण्यास कारण की, आम्ही नाक्यावर उभं राहून हरिश्चंद्रगडाची चर्चा करत असताना एका आगाऊ कार्ट्याने मी पण येतो म्हणून हट्ट धरला आणि आमची ओझीवाहू गाढवं केली.
‘हरिश्चंद्रगड म्हणजे भटक्यांची पंढरी’ हे वाक्य अनेकांनी अनेक वेळा वापरून ‘दाढीच्या जाहिरातीतल्या माणसाच्या गालासारखं’ गुळगुळीत करून टाकलंय. पण प्रत्यक्ष तिथे पोहोचलं की तिथून दिसणारा नजारा पाहून पर्वतांना पंख फुटल्यासारखे वाटतात. दिवसभर हिंडून, गडावरच्या शिवमंदिराशेजारच्या खोदीव गुहांमधे आम्ही मंडळी विसावलो होतो. त्यात ते वर सांगितलेलं ‘झाकलं माणीक’ही होतं. इथून पुढे आपण त्याला माणिकच म्हणूया. तर, रात्रीच्या जेवणानंतर गड उतरायचा आणि माळशेज घाटातल्या खुबी वाट्यावरून पहाटेची ‘लालपरी’ पकडायची असा आमचा बेत होता. त्यानुसार गडफेरी करून, रात्रीची जेवणं आटपून, गप्पा मारत आम्ही चंद्रोदयाची वाट पहात होतो. हळूहळू गप्पांमधला परिचयाचा एक सूर कमी वाटायला लागला. सहज पाहिलं तर हे माणिक डोळे मिटून स्वस्थ बसलेलं. दिवसभर त्याच्या फुशारक्या आणि आचरटपणाची अनंत रुपं आम्ही पाहिली होती तेव्हा हासुद्धा त्यातलाच एक प्रकार असावा असं आम्हाला वाटलं. साधारण बारासाडेबाराच्या सुमारास, वळणदार बोगद्याच्या शेवटी अचानक उजेड यावा तसा पूर्वेकडून जवळपास पुर्ण चंद्र एकदम वर आला. त्यावेळी समोरची दरी आणि पल्याडचे डोंगर जे काही उजळलेत, आहा ! काय सांगू ! पुढची दहापंधरा मिनिटं ते समाधिस्त माणिक सोडलं तर गडावर जागी असलेले आम्ही मंडळी तसंच इतर ग्रुप्स त्या प्रकाशात अक्षरशः विरघळंत होतो. हळूहळू आम्ही निघायच्या तयारीला लागलो. पण हे साहेब तसेच. आता आम्ही त्याला उठवायचं म्हणजे ‘कोंबड्यांनी कसायाला’ दुकान उघडण्याची आठवण करून देण्यासारखं होतं. एका रंजल्यागांजल्याने तर ‘त्याला तसंच ठेऊन जाऊ’ असा नम्र प्रस्तावही मांडला. पण नको तिथे सांघिकता आड आली आणि हिंमत करून आम्ही त्याची समाधी भंग केली. झालं. माणिक उठलं आणि त्या मंद प्रकाशात त्याचे नवे पैलू चमकायला लागले. मंदिरापासून प्रत्यक्ष उतार चालू होईपर्यंत सात टेकड्या चढाव्या उतराव्या लागतात. तो आख्खा रस्ता हा पोरगा झिंगल्यासारखा आपटत आपटत आला. आमची मात्र हसून हसून वाट लागली होती. पण पुढे जरा अवघड टप्पा होता. कातळकड्यावर कोरलेल्या पायर्‍यांवरून अतिशय सावधपणे उतरायंचं होतं. मग मात्र दोघांनी त्याची बखोट धरली आणि शिव्यांनी न्हाऊ माखू घालंत त्याला टोलार खिंडीत आणला. हाश्शहुश्श करत आम्ही तिथे बसलो होतो. समोरच्या जंगलात एक उदमांजर चालत होतं. आम्ही एकमेकांना ते दाखवत होतो. यालाही ते दाखवावं म्हणून आम्ही वळलो तर हे माणिक परत झोपेच्या पुरचुंडीत जाऊन बसलेलं. मग मात्र आमची सटकली. तसाच त्याला लाथा घालून उठवला आणि फरपटत, ठेचकाळत पायथ्यापर्यंत आणला. त्यातसुद्धा तो ‘हा दगड कोणी मधे ठेवला? हा साप इथे काय करतोय? खाली गावात मऊ मऊ गाद्या असतील वगैरे शब्दमौक्तिकं उधळतच होता. पिंपळगाव धरणावरून खुबीफाट्यावर जायला बांधावरून फिरून जावं लागतं. पण नाहीच! याने थेट मधल्या शेताडीतल्या चिखलातच उडी मारली आणि चालत सुटला. आम्ही कपाळावर हात मारून तसेच बसून राहिलो. पण पुढे त्याला अंधारात काही सुधरेना. गुपचूप खालमानेने तो बरबटून परत आला. कसेबसे त्याला घेऊन आम्ही फाट्यावर पोहोचलो. तसा हा वर्दळीचा नाका आहे. तिथल्या एका चहाच्या दुकानात आम्ही पसरलो आणि मग आमचे वाफाळत्या चहाचे फुरके आणि त्याचे घोरण्याचे घुर्र्र्के यांची अशी काही जुगलबंदी लागली, काय सांगू!

मकरंद केतकर

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *